अर्थसंकल्प २०२० : `महिलांसाठी काही नाही, कुचकामी बजेट`
केंद्रीय अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी, काँग्रेसकडून टीका.
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हा अर्थसंकल्प देशाच्या विकासाला चालना देणारा असल्याचे म्हटले आहे. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अर्थसंकल्पात महिलांचीच उपेक्षा झाली आहे. देशाची अर्धी लोकसंख्या व्यापणाऱ्या महिलांसाठी भरीव तरतूदींचा अभाव दिसून येत आहे. यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून या अर्थसंकल्पात महिलांसाठी काहीही देण्यात आलेले नाही, असे म्हटले आहे. तर काँग्रेसने कुटकामी आणि गोंधळात टाकणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी खासदार
या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष अशा काहीच तरतूदी नाहीत, असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी नवीन असे काहीच नाही आहे. मागील वषी महिलांबाबत ज्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, त्याच यावेळी जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेलाही पुरेसे अनुदान का दिले जात नाही, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री, काँग्रेस
सगळ्यात मोठी निराश महाराष्ट्र आणि मुंबईची झाली आहे. मुंबई आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर देशाला देतो. या बजेटमध्ये नवीन काही नाही, नवी बाटली जुनी दारू असे दिसते आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार आधी सांगितलेले,पण शेतीचा दर डबल कसे करणार, हे सांगितलेले नाही. १०० स्मार्ट सिटीच काय झालं? सर्वसामान्य नागरिकांना काय सुविधा दिल्या. अर्थव्यवस्था मोडकळीला गेली, शेअर बाजार कोसळला, हे कशाचे धोतक आहे.
रेल्वे खासगीकरण करणार, LIC ,IDBI तसच करणार दिसत आहे. हे कुचकामी बजेट आहे. फसव्या घोषणा करतात, विकासदर कमी, वित्तीय तूट वाढतेय. हे निरशाजनक बजेट असून नवा रोजगार तयार होत नाही, विकास थांबत आहे. बुलेट ट्रेन फायदा महाराष्ट्राला काय? पण वाटा राज्याचा जास्त घेत आहे, याला विरोध करणारच असे थोरात म्हणालेत.
'निराशाजनक आणि गोंधळात भर'
यावर्षी निराशाजनक आणि गोंधळात टाकणारं बजेट सादर केले आहे, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या बजेटवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा सरळसोट नसून गुतागुंतीचा आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेची घडी बसवण्याच्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प सादर होईल, असे वाटले होते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही, असे राहुल म्हणालेत.