मुंबई : राज्यात सर्वच पक्षांना बंडाळीची लागण. राज्यात ४० ते ५० ठिकाणी भाजप - शिवसेना युतीच्या उमेदवाराविरोधात भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर उभे राहिले आहेत. विधानसभा निवडणूक मतदानासाठी काही दिवस उरले आहेत. तसेच उमेदवारी अर्ज घेण्यासाठी ७ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे दोन दिवसांत बंडखोरांना शांत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही कशी पूर्ण होणार याची चिंता भाजपला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांना बंडखोरी थोपविण्यास यश येत नसल्याचे दिसून येत आहे. बंडखोर बंडाच्या तयारीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे जिल्ह्यातील भाजपमध्ये बंडखोरी काही केल्या क्षमन्याचे नाव घेत नाही. गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील धुळे शहर आणि शिरपूर येथील बंडखोरांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र महाजनांची ही शिष्टाई अपयशी ठरली आहे. धुळे शहरात डॉ. माधुरी बोरसे यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला असून अपक्ष उमेदवारी बाबत आपण ठाम असल्याचे सांगितले आहे. तर शिरपूर मतदारसंघांमध्ये डॉ. जितेंद्र ठाकूर यांनीही भाजप पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढविण्याचा संकल्प कायम ठेवला आहे. डॉक्टर बोरसे आणि डॉक्टर ठाकूर यांची उमेदवारी ही निश्चितच महायुतीच्या उमेदवारांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे.


धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील बंडखोर दोन दिवसात माघार घेतील आणि या दोन्ही जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास जयकुमार रावल यांनी 'झी २४ तास'शी बोलताना व्यक्त केलाय. बंडखोरांची समजूत घातली जाणार असून उत्तर महाराष्ट्रात ४० पेक्षा जास्त तर राज्यात २२० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वासही रावल आणि डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे.