नमाझ पढण्यास नकार दिला म्हणून...
नमाझ न पढणे हे खून करण्याचे कारण कसे होऊ शकते? हा प्रश्न त्यांना पडलाय.
नित्यानंद शर्मा, झी मीडिया, मुंबई : मुंबईच्या अँटॉप हील परिसरात नमाझ पढण्याच्या कारणावरून १५ वर्षीय महाजबीनची हत्या करण्यात आलीय. मुलीची मामी सबिरा आणि स्वालिहा यांना या प्रकरणी अटक करण्यात आलीय. नमाझ म्हणजे ईश्वराची प्रार्थना... मात्र हा नमाझ १५ वर्षांच्या महाजबीनच्या जीवावर बेतला. नमाझ पढण्यास नकार दिला म्हणून तिची मामी सबिरा आणि स्वालिहा यांनी महजबीनचा ओढणीने गळा आवळून तिचा जीव घेतला. या हत्येत तिच्या एका मामेबहिणीचाही समावेश आहे. महजबीनचा जीव गेल्यावर तिच्या या माम्यांनी तिला सायन हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ती बाथरूमध्ये पडल्याचा बनाव रचला.
मात्र, गळ्यावर आवळल्याचे वळ पाहिल्यावर डॉक्टरांना शंका आली आणि बिंग फुटलं. या प्रकारामुळे मुलीच्या वडिलांना धक्का बसलाय. नमाझ न पढणे हे खून करण्याचे कारण कसे होऊ शकते? हा प्रश्न त्यांना पडलाय.
नमाझ पढला नाही म्हणून कोणाचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही... असा प्रकार करणाऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी इस्लाम धर्माच्या जाणकारांनी केलीय.
धर्म मानणे, त्याचे पालन करणे हे सर्वस्वी ऐच्छिक गोष्ट आहे... सर्व धर्म क्षमेची, प्रेमाची शिकवण देतात. प्रार्थना करणे न करणे ही सर्वस्वी खासगी बाब असू शकते. प्रार्थना का करावी, त्याचं महत्त्व काय हे मुलांना समजावून सांगणं गरजेचं आहे... केली नाही म्हणून त्यांचा जीव घेणे हे कृत्य तालीबानीच आहे.