देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मध्य रेल्वेच्या आरपीएफ उपनिरीक्षक रेखा मिश्रा यांची कामगिरी आता दहावीच्या कुमार भारती पुस्तकात वीरांगना या धड्यात मुलांना वाचायला मिळणार आहे. देशभरातून आपले घरदार सोडून मुंबईत आलेल्या नऊशेहून अधिक मुलांना रेखा मिश्रा यांनी आपल्या पालकांच्या हवाली केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेखा मिश्रा... रेल्वे पोलीस दलातील उपनिरीक्षक... सध्या त्या दादर रेल्वे स्थानकात कार्यरत आहेत. मायानगरी मुंबईत वाट चुकून आलेल्या ९५३ अल्पवयीन मुलांना त्यांनी आपल्या पालकांपर्यंत पोहोचवलं आहे. घरातून पळून आलेली... गरीबीमुळे रोजगार मिळवण्यासाठी आलेली, समाजकंटकांनी फसवून आणलेली अशा शेकडो मुलांसाठी रेखा मिश्रांनी मदतीचा हात आईच्या मायेने पुढे केला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रपतींच्या हस्तेही त्यांना गौरवण्यात आलंय. आता त्यांच्या या कार्याची गाथा दहावीच्या मराठीच्या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. 



मायानगरीत भरकटून आलेल्या या मुलांना पोलीस खाक्या बाजूला ठेऊन ममतेनं समुपदेशन करत त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. त्यासाठी अत्यंत मेहनतीनं, सामाजिक भान ठेवत मिश्रा यांनी काम केलं. 


२०१४ मध्ये त्या रेल्वे पोलीस फोर्समध्ये उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्या. त्यानंतर त्यांना या कामाची जाणीव झाली. त्यांचं हे कार्य पाहून त्यांच्याकडे महिला सुरक्षा आणि चाईल्ड वेल्फेअर ही जबाबदारीही देण्यात आलीय. रेखा यांच्या या कार्याचा केवळ धडा नाही तर त्यातून योग्य ती शिकवण विद्यार्थ्यांनी घ्यावी ही अपेक्षा...