ठाकरे, शिवसेना, शिवतीर्थ या समीकरणातला आणखी एक विजयी क्षण
शिवतीर्थ आणि शिवसेनेचं अतूट नातं आजही कायम
मुंबई : नव्या सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे. ठाकरे घराण्यातून यंदा पहिल्यांदाच मुख्यमंत्री होत असल्याने शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरु आहे. शिवसेनेने दादरच्या शिवाजी पार्क म्हणजेच शिवसेनेच्या भाषेत शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा ठेवला आहे. शिवतीर्थ आणि शिवसेनेचं अतूट नातं आजही कायम आहे.
अरबी समुद्राच्या समोर पसरलेलं शिवाजी पार्क हे विस्तीर्ण मैदान. ब्रिटीशांनी राखीव ठेवलेल्या या मैदानाचं पूर्वीचं नाव माहीम पार्क असं होतं. नंतर याचं नाव शिवाजीपार्क झालं. ३० ऑक्टोबर १९६६ चा तो दिवस जेव्हा शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजीपार्कवर झाला. त्यावेळी शिवाजी पार्क खचाखच भरुन दाखवण्याची किमया केली ती बाळासाहेब ठाकरेंनी. तब्बल चार लाख लोकं या मेळाव्याला उपस्थित होते. तेव्हापासून जुळलेलं शिवतीर्थ, शिवसेना आणि मराठी माणूस हे गणित कायम आहे. त्यानंतर बाळासाहेबांच्या, युतीच्या प्रत्येक सभेला हे मैदान खचाखच भरलं.
महाराष्ट्रात पहिल्यांदा युतीचं सरकार आले, त्यावेळी मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले, त्यांनी शपथ घेतली ती शिवाजीपार्कवरच.... बाळासाहेब ठाकरेंनी आदित्यला तलवार दिली तीही या शिवाजीपार्कवरच... बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले ते याच शिवतीर्थावर... याच शिवतीर्थावर शिवसैनिकांनी त्यांच्या लाडक्या साहेबांना अखेरचा निरोप दिला.
बाळासाहेबांच्या स्मृती जपणारी अखंड ज्योत आजही या स्मृतीस्थळावर जळत आहे आणि शिवसैनिकाला प्रेरणा देते आहे. शिवसेनेनं आनंदाचे, विजयाचे, भारावून जाण्याचे अनेक क्षण या शिवतीर्थाच्या साक्षीनं अनुभवले आहेत. म्हणूनच पहिले ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत ते याच शिवतीर्थावरुन... ठाकरे, शिवसेना आणि शिवतीर्थ या समीकरणातला आणखी एक महत्त्वाचा विजयी क्षण साजरा होता आहे.