Reliance AGM 2019: वर्षभरासाठी जिओ फायबर घेणाऱ्या ग्राहकांना एलईडी टीव्ही मोफत
जिओ फायबरच्या ग्राहकांना घरबसल्या नव्या चित्रपटांचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहता येणे शक्य होईल.
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड समूहाच्या सोमवारी मुंबईत झालेल्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी उद्योगसमूहाच्या भविष्यातील वाटचालीविषयी अनेक मोठ्य़ा घोषणा केल्या. यावेळी रिलायन्स जिओच्या महत्त्वाकांक्षी जिओ फायबर या सेवेविषयी मुकेश अंबांनी यांनी माहिती दिली.
जिओ फायबरची सेवा घेणाऱ्या सुरुवातीच्या ग्राहकांना याचा विशेष लाभ मिळणार आहे. त्यानुसार वर्षभरासाठी जिओ फायबर सेवा घेणाऱ्या ग्राहकांना एलईडी टीव्ही मोफत दिला जाईल. हा एलईडी टीव्ही एचडी किंवा फोर के टीव्ही असेल. यासोबत जिओकडून फोर के सेट टॉप बॉक्सही मोफत दिला जाईल.
याशिवाय, जिओ फायबरमुळे ग्राहकांना अनेक ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मसच्या सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे जिओ फायबरच्या ग्राहकांना नव्या चित्रपटांचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहता येणे शक्य होईल. २०२० पर्यंत ही सुविधा सुरु होईल.
जिओ फायबर सेवा ५ सप्टेंबरपासून देशभरात लाँच होणार. ७०० रूपयांपासून जिओ फायबरचे विविध प्लॅन्स ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. यामधील बेसिक प्लॅन हा १०० एमबीपीएस पासून सुरू होऊन १ जीबीपीएसपर्यंत विविध श्रेणी उपलब्ध असतील. त्यांची किंमत प्रतिमहिना ७०० रूपयांपासून १० हजारापर्यंत असेल.
तसेच आगामी वर्षात रिलायन्सकडून आणखी काही करार केले जातील, अशी माहितीही मुकेश अंबानी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेची उलाढाल ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. माझ्या मतानुसार २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था १० ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल. मी डिजिटल क्षेत्रातील विकासामुळे वाढणारे सकल राष्ट्रीय उत्पन्न लक्षात घेऊन हे बोलत आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेतील आलेली मंदी तात्पुरती आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.