अमृता प्रीतम... भावनांच्या हिऱ्याला शब्दरुपी अंगठीत मढवणाऱ्या लेखिका
तुमच्या मनात काय चाललं आहे हे या लेखिकेने त्यांच्या लेखणीतून अचुकपणे मांडलं
सायली पाटील, झी मीडिया, मुंबई: एखादी गोष्ट तेव्हाच प्रभावीपणे किंवा समाधानकारकरित्या साकारण्यात येते जेव्हा तिच्यासाठी जीव ओतून आणि समर्पकपणे काम केलं जातं. अमृता प्रीतम म्हणजे जणू भावना आणि समर्पकपणाचा असाच समुद्र, ज्याची खोली कोणालाही कधीच कळली नाही.
बालपणी समोर आलेली विदारक सामाजिक परिस्थिती आणि त्यामुळे त्यांच्या बालमनावर झालेले परिणाम पाहता, आईच्या निधनाविषयी सांगताना खुद्द अमृता प्रीतमच म्हणाल्या होत्या, ‘....लगा के मै ईश्वर से बेगानी हो गईं हूँ और ईश्वर मुझसे...’. देवाविषयीसुद्धा अशी नाराजी व्यक्त करणाऱ्या अमृता इतक्या हक्काने एखाद्याविषयी लिहीत की, ती व्यक्ती तक्रार आणि नाराजीचा सूरही मनाला लावून घेत नसे.
अमृता प्रितम यांचा संघर्ष आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळातील दिवसांची कहाणी एका मुलाखतीतून त्यांच्याकडूनच ऐकली तेव्हा कळलं या शब्दांना वाव मिळतो तरी कुठून. या शब्दांचा प्रवाह येतो तरी कुठून. ‘मैने अपनी जिंदगी की सारी कडवाहट पी ली.... क्योंकी इसमे तुम्हारे इश्क की एक बूँद मिली थी...’, असं लिहित अमृता यांनी प्रेम, विरह, विश्वास या पैलूंमुळे चमकणाऱ्या नात्याचा हिरा या शब्दरुपी अंगठीत मढवला. 'जहाँ भी आजाद रुह की झलक पडे, समझ लेना वहीं मेरा घर है', असं लिहिणाऱ्या अमृता यांना याच पत्त्यावर भेटता येईल, हे त्यांनी लिहिलेल्या ओळी वाचून निश्चित होतं. त्यामुळे कोणा एका व्यक्तीला भेटण्यासाठी ठिकाणाचीच गरज नव्हे, तर भावनाचा पत्ताही पुरेसा असतो हेच खरं.
प्रेमाविषयी लिहिताना अमृता इतक्या सहजपणे ही भावना सोप्या पण तितक्याच सुरेख उदाहरणांसह मांडत होत्या जे पाहता येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेमाची चाहूल लागण्यापासून ते अगदी नको असणाऱ्या विरहाचा दाह सोसेपर्यंत प्रत्येक भावनेचा प्रत्यय आला, जणू त्यांनी ती अनुभवलीच असावी. खरंतर त्यांनी ती अवनुभवलीही पण, यातून खऱ्या अर्थाने अमृता घडत गेल्या. इमरोज यांच्यासोबतचं त्यांचं नातं म्हणजे शब्दांपलीकडलं. प्रेम म्हणजे फक्त एकमेकांसोबत असणं नव्हे तर प्रेम म्हणजे एकरुप होणं, नात्यात ‘मी’ नसून ‘आपण’ असणं... एकमेकांच्या कलागुणांना वाव देऊन त्याचा असीमीत आदर करणं... आव्हानांनाही लाजवेल असा लढा देणं... प्रेम म्हणजे डोळ्याच्या एकाच नजरेने मनातला कोलाहल ओळखणं आणि एकाच हास्याने जग जिंकल्याची जाणिव होणं...
प्रेमाची ही परिभाषा अमृता यांच्या लेखणीतून कायमच पाहायला मिळाली. पंजाबी, हिंदी अशा भाषांवर असणारं त्यांचं प्रभुत्व हे कायमच नवोदित लेखकांना हेवा वाटेल असं. कोणीतरी लिहितच रहावं आणि आपण फक्त त्यांचे हे शब्द वाचत रहावेत... अशी भावना अमृता यांच्या कविता वाचताना नकळतच मनात घर करुन जाते. कारण, शब्द जरी त्यांचे असले तरी ते व्यक्त करण्याच्या आणि एका लयीत गुंफण्याच्या शिताफीमुळे त्या शब्दांना वाचताना व्यक्त होणाऱ्या भावना या आपल्या असतात. हे त्यांच्या लेखणीचं सामर्थ्यच... अमृताजींविषयी कितीही लिहिलं किंवा बोललं तरी कमीच... पण, तरीही धाडस केलं आहे. कारण आहे ते म्हणजे, त्यांच्या शंभराव्या जयंतीचं.... ‘अमृत’वाणीच्या शंभरीचं....
- सायली पाटील
SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com