मुंबई :  विधान परिषदेतील राज्यापाल नियुक्त आमदारांच्या यादीतून राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांची नावं वगळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यादीतून एकनाथ खडसे, सचिन सावंत, विजय करंजकर यांची नावं वगळण्यात येणार असल्याचं समजतंय. तर महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या राजू शेट्टी यांनी यापूर्वीच आपण आमदारकी स्वीकारणार नसल्याचं जाहीर केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता चार वेगळी नावं टाकून यादी पाठवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या भेटीत या नियुक्तीचा विषय छेडला होता. त्यानंतर राजकीय नावं वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. नवीन यादी मुख्यमंत्री पुढच्या आठवड्यात राज्यपालांकडे पाठवणार असल्याची शक्यता आहे.


महाविकास आघाडी सरकारने 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. पण गेल्यादोन वर्षांपासून राज्यपालांनीया यादीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता नव्या नावांवर राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.


'ते' पत्र बनावट
दरम्यान, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या नावांची शिफारस केल्याचं पत्र बनावट असल्याचं समोर आलं आहे. राजभवनानं झी 24 तासला याबाबत माहिती दिली. 12 आमदारांच्या नियुक्त्यांबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या 6 नावांची शिफारस केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय. हे पत्र सप्टेंबर 2020 सालचं असल्याचं या पत्रात लिहिण्यात आलंय. पत्राची चौकशी करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी भाजप आणि काँग्रेसनं केली आहे.