मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे शिवसैनिकांकडून मारहाण झालेले माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी १२ वाजता ते राजभवनावर जाणार असल्याचे समजते. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपाल कंगनाला भेटतात, मग बेकायदा बांधकाम तुटलेल्या इतर लोकांनाही भेटावं- शिवसेना

मदन शर्मा हे निवृत्त सैनिक असल्यामुळे त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावरही चांगलाच गाजला होता. भाजपसह अनेकांनी याप्रकरणी कठोर कारवाई व्हावी, ही मागणी लावून धरली होती. याशिवाय, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. त्यांनी दुरध्वनीवरून मदन शर्मा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. माजी सैनिकाला अशाप्रकारे मारहाण होणे, खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच भविष्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला होता. 

दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना राणौत हिने राज्यपालांची भेट घेतली होती. शिवसेनेसोबतच्या वादानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगना राणौतच्या पाली हिल येथील अनधिकृत कार्यालयावर कारवाई केली होती. याविरोधात दाद मागण्यासाठी कंगना राणौत राज्यपालांना भेटली होती. यावेळी तिने आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी राज्यपालांकडे केली होती. जेणेकरून देशातील नागरिकांचा विशेषत: तरुण मुलींचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वृद्धिंगत होईल, असे कंगना राणौतने म्हटले होते. 


'पंगा क्विन' राजभवनावर...


दरम्यान, मदन शर्मा यांना झालेली मारहाण आणि कंगना राणौत प्रकरणावरून सध्या विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आता मदन शर्मा यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल.