राज्यातील सुरक्षेचा आढावा, विमानतळांवरची सुरक्षा वाढवली
पाकिस्तानच्या कुरापत्यांना बघता मुंबईसह देशभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोट हल्ला केला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. आज दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पाकिस्तानच्या विमानांना भारतीय वायुसेनेने पिटाळून लावले. दरम्यान, पाकिस्तानच्या कुरापत्यांना बघता मुंबईसह देशभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच पोलिसांना सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी विमानतळांवरची सुरक्षा देशील वाढवण्यात आली आहे. तर राज्यातील सुरक्षितेचा दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकी बोलावली आहे.
मुंबई आणि राज्यातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी बैठक बोलावली असून राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी बैठकीसाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. बालाकोट हल्ल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील किनाऱ्या लगतच्या भागांना सतर्क रहाण्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई तशीही सतर्कच असते. या आधी दहशतवादाच्या झळा सोसल्यानंतर मुंबईची सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि पुलवामा सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यानंतरच मुंबईला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
याआधी अनेकदा मुंबईला लक्ष करण्यात आले आहे. १९९३ मध्ये बॉम्ब स्फोटापासून मुंबई दहशतवादाच्या झळा सोसत आहे. काल आणि आज भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांनतर मुंबईवरच्या धोक्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. विमानतळावर जास्त सुरक्षा वाढविण्यात आली आहे.