मुंबई  : मुंबई महापालिकेच्‍या रुग्‍णालयात (Mumbai Municipal Hospital) देण्‍यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा आणि औषधोपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी 'झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी' (Zero Prescription Policy) राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekant Shinde) यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना दिले आहेत. "झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी" राबविणारी मुंबई महापालिका देशातली पहिली महापालिका ठरणार असून त्यामुळे आरोग्य सेवा पूर्णतः लोकाभिमुख आणि निःशुल्क उपलब्ध होतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही योजना राबविण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्‍यात येणाऱ्या औषधे व संसाधने खरेदी प्रक्रियेमध्‍ये सुधारणा करण्‍याचे निर्देश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री  शिंदे यांनी के.ई.एम रुग्‍णालयाला भेट दिली होती. त्यावेळी रुग्ण आणि नागरिकांशी झालेल्‍या चर्चे दरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. महानगरपालिका रुग्‍णालयात उपलब्‍ध औषधे व संसाधनां व्‍यतिरिक्‍त नातेवाईकांमार्फत रुग्णांच्या उपचारासाठी खर्च केला जातो. 


गरीब रुग्णांवर या खर्चाचा अतिरिक्त बोजा पडतो. आरोग्‍य उपचारावर होणाऱ्या (आऊट ऑफ पॉकेट एक्‍सपेंडीचर) खर्चामुळे साधारणतः 10  टक्‍के नागरिक दारिद्रय रेषेखाली खेचले जातात.  राष्‍ट्रीय स्‍तरावर विविध संस्‍थांनी केलेला अभ्‍यास आणि संशोधनातून निदर्शनास आल्याचे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.


गरीब रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांमार्फत नि:शुल्क सेवा उपलब्ध व्हावी यासाठी "झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी" राबविण्याबाबत महापालिकेला निर्देश दिले आहेत. त्यासाठी यासंदर्भात सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. 


मुंबई महानगरपालिकेमार्फत 4 वैद्यकीय महाविद्यालय, 1 दंत महाविद्यालय, 16 उपनगरीय रुग्णालये, 5 विशेष रुग्णालये, 30 प्रसूतिगृहे, 192 दवाखाने सुरू आहेत. याखेरीज 202 हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे "आपला दवाखाना" देखील कार्यरत आहेत.  या वैद्यकीय व्यवस्थेतील रुग्‍णालयांमध्ये 7100, उपनगरीय रुग्णालयामध्ये 4000, विशेष रुग्णालयात 3000 व इतर अशा एकूण सुमारे 15 हजार रुग्णशय्या आहेत. यामध्ये  50 हजार पेक्षा अधिक रुग्ण दररोज बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घेतात. तसेच, वार्षिक सरासरी 20 लाख पेक्षा अधिक रुग्ण आंतर रुग्ण सेवेचा लाभ घेतात.