ट्विटरवर वकील सतीश मानेशिंदे यांचं फेक अकाऊंट
सतीश मानेशिंदे रिया चक्रवर्तीचे वकील
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला सीबीआयने अटक केली आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्तीने प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे यांना आपली बाजू मांडण्यासाठी निवडलं. वकील सतीश मानेशिंदे यांचं ट्विटरवर फेक अकाऊंट सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्वतः मानेशिंदे यांनी याबाबत मीडियाला माहिती दिली आहे.
'मित्रांनो, हे वरील खाते माझे अधिकृत खाते नाही. कृपया त्याकडे दुर्लक्ष करा. माझे अधिकृत खाते काही कारणांमुळे काही काळ निष्क्रिय झाले आहे. माझ्याकडे सक्रिय कोणतेही ट्विटर खाते नाही.'
सतीश मानेशिंदे यांच्या या फेक अकाऊंटवरून रिया चक्रवर्ती संदर्भात काही ट्विट करण्यात आले आहेत. मात्र आता त्यांनी स्वतः हे आपलं फेक अकाऊंट असल्याचा खुलासा केला आहे.
मानेशिंदे यांच्या फेक अकाऊंटवरून आतापर्यंत चार ट्विट करण्यात आले आहेत. सतीश मानेशिंदे हे नावाजलेले क्रिमिनल वकील आहे. 'हाय प्रोफाईल लॉयर' म्हणून मानेशिंदे ओळखले जातात. ज्यांनी आतापर्यंत अनेक राजकारणी, कलाकार व्यक्तींच्या केस हातात घेतल्या आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात ते अभिनेता संजय दत्तचे वकील होते. तसेच 'ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह' प्रकरणात सलमान खानचे वकील होते.