भिवंडी : सध्या सर्वत्र रिक्षा चालक मग्रुरी तसेच त्यांच्याकडून महिलांवर होणा-या अत्याचाराच्या बातम्यांमुळे टीकेचे धनी होतात. मात्र भिवंडीतील कोनगावमध्ये अर्धवेळ रिक्षा चालवून एमपीएससी परीक्षेची तयारी करण्या-या अनिल पाटील युवकाने एक अनोखा आदर्श घालून दिलाय. रिक्षात विसरलेले चार लाखांचे दागिने परत करून प्रामाणिकपणाचा दाखला दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी दुपारी त्यांच्या रिक्षात शिवाजी चौक येथून एक महिला कोनगाव येथे जाण्यासाठी बसली. महिला कोनगाव पेट्रोल पंपावर उतरल्यानंतर भाडे घेऊन अनिल रिक्षा दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये घेऊन गेला. अर्धा तास थांबल्यानंतर रिक्षाच्या मागच्या बाजूला बॅग असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.


ती बॅग तपासली असता त्यात सहावीची पुस्तकं आणि दागिने आढळून आले. यावेळी अनिलने प्रामाणिकपणा दाखवत बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली. त्याचवेळेस पिंपळास येथील भावाच्या घरी रक्षाबंधन सणासाठी आलेली योगिता रडवलेल्या चेह-याने कैफियत सांगण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आली. मात्र आगोदरच दागिने देण्यासाठी अनिल पोलीस स्टेशनमध्ये आल्याने तिला आनंदाश्रू आवारता आले नाही. तिने यावेळी आपल्याला भाऊ भेटल्याचा आनंद व्यक्त केला. अनिलच्या या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरांतून कौतूक केलं जातंय.