मुंबई: 'रिंकिया के पापा' या भोजपुरी गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेले संगीतकार धनंजय मिश्रा यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर काल सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मीरा भायंदर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धनंजय मिश्रा यांनी 'रिंकिया के पापा' या लोकप्रिय गाण्यासह अनेक अल्बम आणि चित्रपटांच्या गाण्यांना संगीत दिले होते.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या निधनानंतर अनेक भोजपुरी कलाकारांनी सोशल मीडियावरुन धनंजय मिश्रा यांना श्रद्धांजली वाहिली. धनंजय मिश्रा यांची गाणी नेहमी स्मरणात राहतील. तुमच्यासोबत काम करायचे राहून गेले, अशी प्रतिक्रिया भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानी हिने व्यक्त केली. 

तर लोकप्रिय भोजपुरी कलाकार निरहुआ यानेही सोशल मीडियावर पोस्ट करत मिश्रा यांना आदरांजली वाहिली. भोजपुरी इंडस्ट्रीमधील आमच्या आवडीचे संगीतकार धनंजय मिश्रा यांच्या जाण्याने आम्हा सर्वांना मोठा धक्का बसला आहे. धनंजय आमच्या हृदयात आठवण बनून राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे निरहुआने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तत्पूर्वी कालच सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बसू चॅटर्जी यांनही जगाचा निरोप घेतला होता. समांतर सिनेमाला वेगळ्या आणि तितक्याच प्रभावीपणे मांडण्यासाठी चॅटर्जी ओळखते जात होते. किंबहुना येत्या काळातही चित्रपचप्रेमी आणि अभ्यासकांसाठी त्यांचे काही चित्रपच हे आदर्शस्थानी असतील यात शंका नाही. 'छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'बातों बातों मे', 'एक रुका हुआ फैसला', 'चमेली की शादी' या चित्रपटांसाठी त्यांच्या दिग्दर्शनाला अनेकांचीच दाद मिळाली होती.