२०५० पर्यंत मुंबई-ठाणे-नवी मुंबई या शहरांना जलसमाधी मिळणार
जागतिक तापमानवाढीमुळे दक्षिण आणि उत्तर धुव्रावरचं बर्फ वितळतंय
बागेश्री कानडे, झी २४ तास, मुंबई : 'गेट वे ऑफ इंडिया' डोळेभरुन पाहा... नरिमन पॉईंट आणि कुलाबा फिरून घ्या... शिवाजी पार्कही डोळ्यात साठवून घ्या... सीएसएमटी स्टेशनवरही एक फेरफटका मारुन घ्या... कारण येत्या काही वर्षांत हे सगळं पाण्याखाली जाणार आहे. तुमचं आवडतं शहर असलेल्या मुंबईला जलसमाधी मिळणार आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त ३१ वर्षांचं राहिलंय. २०५० पर्यंत देशाची शान असलेली ही शहरं समुद्रात बुडणार आहेत.
जागतिक तापमानवाढीमुळे दक्षिण आणि उत्तर धुव्रावरचं बर्फ वितळतंय. बर्फ वितळण्याचा वेग असाच कायम राहिल्यास समुद्राची पातळी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळं २०५० पर्यंत मुंबईला जलसमाधी मिळेल असा अंदाज 'को-ऑर्डिनेटर डायना लोनेस्को' या संस्थेनं वर्तवलाय.
या संस्थेच्या माहितीनुसार, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, कुलाबा, मलबार हिल, दादर, वरळी, वांद्रे, चेंबूर आणि वर्सोवा समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे. जवळपास निम्मी मुंबई समुद्र गिळून टाकणार आहे. हा धोका फक्त मुंबईसाठीच नाही. तर मुंबईजवळच्या ठाणे, आणि नवी मुंबईलाही असणार आहे.
मुंबईतले अनेक भाग समुद्रात भराव टाकून तयार करण्यात आलीय. त्यातच तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढतेय. ही वाढ अशीच राहिली तर मुंबई पाण्याखाली जाईल. गेल्या काही वर्षात शिवाजी पार्क परिसरात समुद्राच्या उधाणाचं पाणी घुसतंय. हे प्रमाण आणखी वाढण्याची भीती आहे. ज्या माणसांनी मुंबई तयार केली त्याच माणसाच्या वारसदारांमुळे मुंबई कायमची पाण्याखाली जाणार आहे.