मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याचा भाऊ आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना तब्बल ४ कोटी ७० लाख रुपयांचं कर्जमाफी मिळाल्याचा दावा करणारा एक फोटो गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. याच 'फेक न्यूज'वर अभिनेता रितेश देशमुखनं मौन सोडलंय. 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कागदपत्रांचा फोटो

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटोचा धागा पकडून मानवाधिकार संघटना 'मानुषी'च्या संस्थापक आणि प्रोफेसर मधू किश्वर यांनीही देशमुख बंधुंवर टीका केली होती. 'काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश आणि अमित यांनी चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेचा फायदा घेत ४ कोटी ७० लाखांची कर्जमाफी मिळवल्याचं' मधू किश्वर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. उल्लेखनी म्हणजे, 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'द्वारे फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती. 



याला आता रितेशनं सोशल मीडियाच्या माध्यमातूनच उत्तर दिलंय. 'मधु किश्वरजी ज्या कागदपत्रांच्या सहाय्यानं हे आरोप केले गेले आहेत ते चुकीच्या हेतूने पसरवले जात आहेत. त्यात उल्लेख केल्याप्रमाणे मी किंवा माझ्या भावानं कोणत्याही प्रकारचं कर्जच घेतलेलं नाही. त्यामुळे त्याबद्दल कर्जमाफी घेण्याचा प्रश्नच येत नाही. कृपया दिशाभूल होऊ देऊ नका. धन्यवाद ' असं प्रत्यूत्तर रितेशनं अत्यंत सौम्यपणे पण तितक्याच थेट शब्दांत दिलंय. 



यानंतर मधू किश्वर यांनी आपलं वादग्रस्त ट्विट डिलीट करून रितेश देशमुख यांची माफी मागितली आहे. इतकंच नाही तर या प्रसंगामुळे आपल्याला अनेक धडेही मिळाल्याचं किश्वर यांनी म्हटलंय.