मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिला निर्णय 'मुंबई नाईट लाईफ'चा घेतला आहे. २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून नाईट लाईफ सुरू होणार आहे. आदित्य ठाकरेंचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या निर्णयाचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित पवार यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्या मुंबई नाई लाईफ या निर्णयाचं कौतुक केलं आहे. हा निर्णय महाविकासआघाडी सरकारने घेतला असला तरीही याचं संपूर्ण श्रेय आदित्य ठाकरेंना जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून मुंबईला निश्चितच पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं शहर बनवेल असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. 


रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट 


मुंबईमध्ये 'नाईट लाईफ'ला परवानगी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आणि याचं संपूर्ण श्रेय माझे मित्र आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना जातं. यामुळे मुंबईमध्ये वडापावच्या स्टॉलपासून तर हॉटेल, मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स हे चोवीस तास सुरु ठेवता येणार आहेत. सध्या फक्त तारांकित हॉटेलमध्येच कॅफे 24 चालू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु नवीन निर्णयाचा सामान्य जनता आणि उद्योग-व्यावसायिक या दोघांनाही फायदा होईल, असं मला वाटतं. म्हणून हा निर्णय स्वागतार्ह असून मुंबईला निश्चितच पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं शहर बनवेल याची मला खात्री वाटते. या निर्णयाबद्दल आदित्य जी ठाकरे यांचं मी अभिनंदन करतो.


दिवसेंदिवस सगळीकडे भीषण बनत चाललेल्या वाहतुकीच्या प्रश्नावर आणि त्यामुळे वाढत असलेल्या प्रदूषणाच्या समस्येवरही काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यासाठी या निर्णयाचा फायदा होईल. प्रत्येक व्यावसायिक स्वेच्छेने आपलं दुकान किंवा आस्थापना सुरु ठेऊ शकतात, त्यासाठी त्यांना कोणतीही सक्ती करण्यात येणार नाही. मात्र दारू विक्री करणारे रेस्टॉरंट आणि दुकाने चोवीस तास उघडी ठेवता येणार नाहीत तर सध्याच्या नियमानुसारच मध्यरात्री दीड वाजेपर्यंतच त्यांना दुकाने उघडी ठेवता येणार आहेत. सध्या प्रायोगिक तत्वावर घेण्यात आलेल्या या निर्णयाचे विकासाच्यादृष्टीने सकारात्मक परिणाम दिसतील, असं मला वाटतं.



२६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईतली रेस्टॉरंटस, मॉल्स, मल्टिप्लेक्सेस सुरू राहणार आहेत. मुंबईकरांना रात्रभर शॉपिंग करता येणार आहे. सिनेमा पाहता येणार आहे. रात्री रेस्टॉरंटमध्ये खाता-पिता येणार आहे. आदित्य ठाकरेंचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पर्यटन मंत्री होताच त्यांनी हा पहिला निर्णय घेतला आहे. आहार संघटनेनं नाईट लाईफच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यामुळे रोजगार वाढले अशी प्रतिक्रिया आहार संघटनेचे अध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी दिली आहे.