मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवारी ट्विटरवर एन्ट्री घेतली. त्यांचे ट्विटर अकाऊंट सुरु होताच अवघ्या काही तासांमध्ये हजारो नेटकऱ्यांनी त्यांना फॉलो करायला सुरुवात केली आहे. @DrMohanBhagwat असे मोहन भागवत यांच्या ट्विटर हँडलचे नाव आहे. त्यामुळे आता उशीरा का होईना संघानेही टेक्नोसॅव्ही होण्याचा दिशेने पहिले पाऊल टाकले, असे म्हणावे लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह भैयाजी जोशी, सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, वी भागय्या, अरूण कुमार आणि अनिरुद्ध देशपांजे या संघाच्या नेत्यांनीही ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे. मात्र, यापैकी कोणीही अद्यापपर्यंत एकही ट्विट केलेले नाही. परंतु, मोहन भागवत ट्विटरवर एक्टिव्ह झाल्याचे समजताच अवघ्या काही तासांमध्ये सात हजार जणांनी त्यांना फॉलो करायला सुरुवात केली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपचे अनेक नेते टेक्नोसॅव्ही झाले होते. आजच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ट्विटरवरील फॉलोअर्सच्याबाबतीत जगातील मोजक्या राजकीय नेत्यांमध्ये समावेश होतो. त्यांना ट्विटरवर जवळपास ४.८३ कोटी लोक फॉलो करतात. 



 मात्र, भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मात्र या आधुनिकीकरणाचे वारे लागले नव्हते. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघटनेचे अनेक नेत्यांनी ट्विटर, फेसबुक यांसारख्या माध्यमांपासून दूर राहणेच पसंत केले होते. मात्र, उशीरा का होईना या सर्वांनी ट्विटरवर हँडल सुरु करणे, ही आगामी बदलाची सुरुवात मानली जात आहे.