भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपणार, गर्दीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा
जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी आपापल्या भागात जन आशीर्वाद यात्रा सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातून केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागलेले नारायण राणे, डॉ. भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील या मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा भाजपने सुरू केली आहे.
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रांबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यात्रांना गर्दी होत असल्यामुळे कोरोना वाढण्याचा धोका असून यावर अनेक मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. इतर राजकीय पक्षांच्या मेळाव्यांनाही गर्दी होत असून ही बाब चिंताजनक असल्याचा सूर या बैठकीत उमटला. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वच राजकीय पक्षांना गर्दी न करण्याबाबत आवाहन करणार आहेत.
संजय राऊत यांनी केली होती टीका
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही जनआशीर्वाद यात्रेवर टीका केली होती. 'जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहित आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात. ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा', असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचं प्रत्युत्तर
संजय राऊत यांच्या टीकेला केंद्रीय मंत्री कपिल पटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवेसेनेच्या रॅलीमध्ये कोरोना पसरत नाही का? भाजपने काही केल्यास कोरोना पसरतो का? असा सवाल कपिल पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राजकीय मेळावे सभा घेतात. सरकार पुरस्कृत शिवसेनेच्या रॅलीमध्ये कोरोना पसरत नाही. पुण्यातील कार्यक्रमात 5 ते 10 हजार लोक कार्यक्रमाला जमतात. त्यावेळी कोरोना पसरत नाही. मात्र जर भाजपने काही केल्यास लगेच कोरोनाला आमंत्रण कसे मिळते असा सवाल केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केला आहे.