मुंबई : मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्यावरून सध्या भाजप-शिवसेनेत (BJP - Shivsena) राजकारण सुरु आहे. यावर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून (Saamana Editorial) भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेवरील भगवा हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे तेज आहे. भूगर्भामध्ये प्रचंड खळबळ माजून पृथ्वीच्या तप्त अंतःकरणाचे कढ बाहेर आले आणि शांत आले. मुंबई म्हणजे सदैव उसळणारा अग्नी आहे. या अग्नीचा रंग भगवा आहे. भगवा शुद्धच आहे. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल, असं म्हणतं शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे. 


काय म्हटलंय 'सामना' अग्रलेखात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. भारतीय जनता पक्षाने असे ठरवले आहे की, या वेळी मुंबई महानगरपालिकेवर शुद्ध भगवा फडकवायचा. आता हा शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे.


विचारांचा झेंडा एकच असतो. त्यात भेसळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बिहारवर भगवा फडकवू किंवा भगवा फडकला असे विधान भाजप पुढाऱ्यांकडून झाल्याचे स्मरत नाही. कारण त्यांचा तसा भगव्याशी संबंध नाही. शिवसेनेशी युती झाल्यापासून त्यांचा भगव्याशी संबंध आला. भाजप शिवसेनेसोबत नव्हता तेव्हापासून मुंबईवर भगवा फडकलेलाच आहे. हा भगवा शुद्ध, तेजस्वी आणि प्रभावी आहे. यापेक्षा वेगळा भगवा अस्तित्वात आहे असे महाराष्ट्राला वाटत नाही. हा भगवा छत्रपती शिवरायांचाच आहे. आता भाजपमध्ये कुणी प्रतिशिवाजी निर्माण झाले असतील व त्यांनी त्यांचा स्वतंत्र भगवा निर्माण केला असेल तर तो त्यांचा प्रश्न. शिवरायांचे सातारा व कोल्हापूरच्या गादीचे वंशज भाजपमध्ये सामील करून घेतले आहेत, पण भगव्याची मालकी मराठी शिवरायांच्या प्रजेकडे म्हणजे मराठी जनांकडेच आहे. तोच भगवा मुंबईवर पन्नास वर्षांपासून फडकत आहे.


मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्क नाकारण्यासारखेच आहे. मुंबई महापालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसांचे मुंबईशी नाते तोडण्यासारखेच आहे. भगवा उतरविणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे ही १०५ मराठी हुतात्म्यांशी सरळ सरळ बेइमानी आहे.


मराठी अस्मितेचा, हिंदू तेजाचा अस्सल भगवा उतरविण्याचे कपट-कारस्थान जे करीत आहेत ते देशातील प्रखर हिंदुत्वाचा अपमान करीत आहेत. त्यांना मुंबई महापालिकेवरील भगवा राजकीय स्वार्थासाठी उतरवायचा आहे. धन्य धन्य त्या दळभद्री विचारांची! महाराष्ट्राच्या मातीतून हे असे कोळसे निपजावेत व भगव्यास कलंक लागावा यासारखे दुर्दैव ते कोणते! भगवा हा जगभरात एकच आहे, तो म्हणजे शिवरायांचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचाच! मुंबई महापालिकेवरील भगव्याची चिंता ज्यांना वाटत आहे ते सगळे बेगडी नरवीर बेळगावच्या महानगरपालिकेवरील भगवा भाजपच्याच नतद्रष्टांनी उतरविला तेव्हा कोणत्या बिळात लपले होते?


बेळगावच्या मराठी माणसाच्या हाती जो भगवा आहे तोच भगवा मुंबई महापालिकेवर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून फडकतोय. हा भगवा कोणाला उतरवायचा आहे काय? मुंबई महापालिका ही मराठी अभिमान, स्वाभिमानाचे प्रतीक आहे. जोपर्यंत पालिकेवर भगवा आहे तोपर्यंत महाराष्ट्र दुश्मनांचे पाशवी हात मुंबईच्या गळय़ापर्यंत पोहोचणार नाहीत. मुंबई भांडवलदारांची बटीक होण्यापासून रोखण्याचे काम याच तेजस्वी भगव्याने केले आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले ते राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून कायमचे नेस्तनाबूत झाले.