`उंदरालया`त बसून सेनेचा भाजपवर वार!
राज्यात सध्या उंदीर भ्रष्टाचार चांगलाच गाजतोय. या प्रकरणावरुनच सरकारचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं सरकारला घरचा आहेर दिलाय.
मुंबई : राज्यात सध्या उंदीर भ्रष्टाचार चांगलाच गाजतोय. या प्रकरणावरुनच सरकारचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं सरकारला घरचा आहेर दिलाय.
महाराष्ट्राचे मंत्रालय जणू उंदरालय झालंय अशा शब्दांत शिवसेनेनं सरकारवर हल्लाबोल केलाय. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनामधून शिवसेनेनं सरकारवर तोंडुसख घेतलंय. या भ्रष्टाचारामुळे सरकारची तिजोरीच कुरतडलेली नाही तर विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोल फोडले आहेत असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलंय.
काय म्हटलंय अग्रलेखात...
उंदीर घोटाळय़ाने फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नाही तर विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोलही फोडले आहेत, येथील तथाकथित स्वच्छ प्रशासनाला बिळे पडली आहेत, मंत्रालयाची जमीन ‘भुसभुशीत’ झाली आहे, असे आरोप सत्ताधारी पक्षाचेच लोक करीत आहेत. महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू ‘उंदरालय’ झाले आहे.
एकनाथ खडसे यांनी कोणत्या हेतूने या घोटाळ्याचा स्फोट केला हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण ‘अमुक-तमुक मुक्त’ करण्याची भाषा करणाऱ्यांच्याच राज्यात मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले आहे. ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. अन्यथा, राज्यातील जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे!