मुंबई : सत्तेच्या राजकारणावरुन शिवसेनेने काँग्रेसवर 'सामना'च्या संपादकीयमधून जोरदार हल्लाबोल चढवला होता. आता काँग्रेसकडून शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अग्रलेख लिहिताना माहिती घेऊन तो लिहायला हवा होता, असा सल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेचा सत्तेतील  'सामना' पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील अंतर्गत कुरबुर पुढे आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी आणि किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही, असे म्हणत शिवसेनेने काँग्रेसवर टीका केली आहे. याला बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले आहे.


विधान परिषदेच्या १२ जागांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते समान जागा वाटपांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं म्हटले जात होते. त्यावरून शिवसेनेनं काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरु आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे, असं म्हणत शिवसेनेनं काँग्रेसला टोला हाणला आहे. यावरुन बाळासाहेब थोरात यांनी आधी पूर्ण माहिती करुन घेतली पाहिजे होते. नंतर अग्रलेख लिहायला हवा होता, असे म्हणत शिवसेनाला जोरदार टोला लगावला आहे.