मुंबई : मुंबईसह एमएमआर भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून मात्र आता वेळकाढूपणा केला जात आहे.   राज्य सरकार, महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय आधीच झाला होता, असे असताना स्वतःच्या अधिकारात निर्णय घेता येत असतानाही जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. १७ तारखेपासून हा प्रवास महिलांना करता येणार होता व त्याच दिवसापासून नवरात्र सुरू होणार हे माहित असताना रेल्वेबोर्डाची परवानगी आधीच का घेतली नाही? याचे उत्तर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईच्या महिलांना दिले पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, मंदिरे उघडा म्हणून बोंब ठोकणाऱ्या भाजपाला नवरात्रोत्सवात आपल्या दुर्गाशक्ती माय भगिनींकरिता लोकल चालू होईल याची तमा नाही का? मुंबई भागातील महिलांच्या लोकल प्रवासाठी भाजपाचा आवाज बंद का? आता ते घंटानाद का करत नाहीत? असे सवाल उपस्थित करत सावंत यांनी भाजपाच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाडला आहे.



महिलांच्या लोकल प्रवासासंदर्भात आधीच बैठक घेऊन त्यावर सविस्तर चर्चा होऊन वेळही निश्चित करण्यात आली होती. राज्य सरकारने रेल्वेला महिलांना प्रवासाची मुभा द्या असे कळवले. पण आता रेल्वे विभाग हा रेल्वे बोर्डाची परवानगी लागेल अशी कारणे देऊन वेळकाढूपणा का करत आहे. चर्चा झाल्याप्रमाणे रेल्वे बोर्डाची परवानगी का घेतली गेली नाही. तसेच हा निर्णय आधीच घेतला गेला असल्याने रेल्वेचे सीटीपीएम स्वतःच्या अधिकारात हा निर्णय घेऊ शकतात. मग पियुष गोयल त्यांना विचारणा का करत नाहीत?


रेल्वेमंत्री हे मुंबईचे आहेत, भारतीय जनता पक्षाचे ते नेते आहेत परंतु त्यांनाही मुंबईतील लोकल प्रश्नासंदर्भात लक्ष देण्यास वेळ नाही हे आश्चर्याचे वाटते, असे सावंत म्हणाले..