`अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा पोंक्षेंचं योगदान श्रेष्ठ`
शरद पोंक्षेंच्या `त्या` वक्तव्यावर सचिन सावंतांची प्रतिक्रिया
मुंबई : अभिनेते शरद पोंक्षेंनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात केलेल्या विधानावरून राजकारण थांबायच नाव घेत नाही. शरद पोंक्षेंनी या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांच योगदान श्रेष्ठ असल्याचा दावा केला होता. यावरून आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट करून पोंक्षेंवर निशाणा साधला आहे.
ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणतात की,'अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ असे म्हणणे म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रात हॉलिवूडच्या बेन किंग्जले, अल पचिनो आणि बॉलिवूडच्या दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा शरद पोंक्षे यांचे योगदान श्रेष्ठ आहे असे म्हणणे होय! ' (फर्ग्युसन महाविद्यालयात 'मी सावरकर' कार्यक्रमावेळी शरद पोंक्षेंविरोधात घोषणाबाजी)
सचिन सावंतांनी केलेल्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या ट्विटमध्ये सचिन सावंत यांनी शरद पोंक्षे यांची तुलना हॉलिवूडच्या बेन किंग्जले, अल पचिनो आणि बॉलिवूडच्या दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्याशी केली आहे. बच्चन यांच्यापेक्षा शरद पोंक्षेंच योगदान श्रेष्ठ असल्याचा खोचक टोला सचिन सावंतांनी लगावला आहे.
अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांच योगदान श्रेष्ठ असल्याचं शरद पोंक्षे म्हणाले होते. तसेच पोंक्षे म्हणाले होते की,'आंबेडकर आणि फुले हे त्या त्या जातीत जन्माला आल्याने त्यांना अपमानाचे चटके बसले. त्यामुळे विद्रोह करत प्रवाहाविरोधात लढले. मात्र कोणताही अपमान झाला नसतानाही सावरकर ब्राम्हण विरोधात उभे राहिले. त्यामुळे सावरकर हे या दोन्ही राष्ट्रपुरूषांपेक्षा कांकणभर श्रेष्ठ असल्याचं ते म्हणतात.'