मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हा 100 कोटी वसुली प्रकरणात नुकताच माफीचा साक्षीदार झाला आहे. सचिन वाझे आतापर्यंत दोनदा निलंबित तर एकदा बडतर्फ झाला आहे. याशिवाय सचिन वाझे विरोधात आतापर्यंत चार गुन्हे नोंदवले गेले आहेत. यापैकी एका प्रकरणात त्याला जामीन मंजूर झालेला आहे. (Sachin Vaze to turn approver in corruption case against Mahrashtra ex minister Anil Deshmukh)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र पोलीस दलात 1990 मध्ये रुजू झालेल्या सचिन वाझे याच्या विरुद्धचे खटले कोणते आहेत याचा हा तपशील पाहून तुम्हालाही धक्का बसेल. 


सचिन वाझेवरील पहिला खटला
ख्वाजा युनूस याच्या कोठडीतील मृत्यूनंतर सचिन वाझेला सर्वात प्रथम सेवेतून निलंबित करण्यात आले होते. ख्वाजा युनूस हा 2002 च्या घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपी होता.


तेव्हापासून सुरू असलेला खटला अजूनही सुरू आहे. या प्रकरणात सचिन वाझेला निलंबित करण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणात सचिन वाझेला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. 


सचिन वाझेवरील दुसरा खटला 
16 वर्षांच्या निलंबनानंतर जून 2020 मध्ये महामारीच्या काळात वाझेला मुंबई पोलिसमध्ये सरकारने पुन्हा रुजू करुन घेतले. मात्र अँटिलिया बॉम्बस्फोट आणि व्यापारी मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात त्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) 2021 मध्ये अटक केली. 


बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत सचिन वाझेविरुद्ध गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. या प्रकरणात सचिन वाझे हा एक प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणात त्याचा जामीन अर्जही विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळला आहे.


सचिन वाझेवरील तिसरा आणि चौथा खटला
मार्च २०२१ मध्ये अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात अटक झाल्यानंतर, वाझेला निलंबित करण्यात आले आणि नंतर मुंबई पोलिसातून बडतर्फ करण्यात आले.  दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले.  


देशमुख यांनी वाझे यांना मुंबई आणि आसपासच्या विविध रेस्टॉरंट आणि बारमधून दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा हा आरोप होता. या प्रकरणात आता सचिन वाझे माफिचा साक्षीदार झाला आहे. 


दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सीबीआय आणि ईडीकडून सुरु आहे. या दोन्ही केंद्रीय तपाय यंत्राणांच्या तपासात सचिन वाझे हा आरोपी आहे.  ईडी आणि सीबीआयच्या दोन्ही खटल्यांमध्ये सचिन वाझेला न्यायालयाने जामीन मंजूर केलेला नाही.


मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले असताना, एजन्सीला आरोपांमध्ये तथ्य आढळून आले आणि त्यामुळे त्यांनी एफआयआर नोंदवला. त्यांच्या एफआयआरच्या आधारे, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तक्रार नोंदवली आणि प्रकरणाचा तपास केला. 


तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार वाझेने देशमुख यांच्या आदेशानुसार बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे गोळा केले होते आणि नंतर संपूर्ण पैसे त्याच्या साथीदारांमार्फत त्यांना दिले होते. ईडी आणि सीबीआय या दोन्ही एजन्सीच्या तपासानुसार शंभर कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझेने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. दरम्यान सीबीआयच्या तपासात सचिन वाझे माफिचा साक्षीदार झाला आहे. तर ईडीकडेही आपल्याला माफिचा साक्षीदार बनवावे यासाठी तो प्रयत्नशील आहे. यासाठी त्याने ईडीकडे तसा अर्जही केला आहे.