नायर रुग्णालयात ३०० कोरोना बाधित मातांची सुखरुप प्रसूती
नायर रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांची अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका
मुंबई : प्रसूतिशास्त्र विभाग, नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभाग आणि भूलशास्त्र विभाग या तीन विभागांच्या सुयोग्य समन्वयातून आज सकाळ पर्यंत ३०२ मातांची सुखरुप प्रसुती करण्यात आली आहे. ज्यापैकी 11 बालकं कोरोना बाधित होते. परंतु उपचारानंतर हे सर्व बोलकं करोनामुक्त झालेले आहेत. नायर रुग्णालयात दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविड बाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. त्यानंतर गेल्या २ महिन्याच्या कालावधीत नायर रुग्णालयात ३०२ कोरोना बाधित मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे.
एकूण प्रसुतींमध्ये एका तिळ्यांसह जुळ्या बाळांचाही समावेश आहे. कालच तान्हुल्यांच्या टॅ्याह्यांच्या मंगलस्वरांनीही त्रिशतकी टप्पा ओलांडला असून बाळांचीही संख्या आज सकाळ पर्यंत ३०६ झाली आहे. अशी माहिती नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा मलिक, प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नीरज महाजन आणि भूलशास्त्र विभागाच्या डॉक्टर चारुलता देशपांडे यांनी दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार एकाच रुग्णालयात ३०० कोरोना बाधित मातांची प्रसूती झाल्याचे हे जगातील आजपर्यंतचे एकमेव उदाहरण आहे.
मुंबई सेंट्रल परिसरात असणाऱ्या नायर रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांनी 'पीपीई किट' घालून घामाच्या धारा वाहत असताना अक्षरशः २४ तास अविश्रांत मेहनत घेऊन नवजीवन फुलवण्यात अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावली आहे. या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी 'पीपीई किट घातल्यानंतर सलग सहा तास पाणी न पिता किंवा शरीरधर्मही न उरकता अव्याहतपणे काम केले आहे. या तिन्ही विभागातील अनेक डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय हे गेल्या दोन महिन्यांपासून घरी न जाता रुग्णालयात राहूनच अथकपणे काम करीत आहेत.
गेले दोन महिने सातत्याने अविश्रांत मेहनत घेणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रसूतिशास्त्र विभागातील डॉक्टर अरुंधती तिलवे, डॉक्टर चैतन्य गायकवाड, डॉक्टर अंकिता पांडे आणि परिचारिका सिस्टर रुबी जेम्स, सिस्टर सुशिला लोके, सिस्टर रेश्मा तांडेल यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागातील डॉक्टर पुनम वाडे, डॉक्टर संतोष कोंडेकर आणि परिचारिका सीमा चव्हाण, रोझलीन डिसूजा यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
यानिमित्ताने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी तिन्ही विभागातील सर्व डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्या मेहनतीचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. तर कोविड विषयक समन्वयक डॉक्टर सारिका पाटील आणि डॉक्टर सुरभी राठी यांनीही तिन्ही विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या अविश्रांत प्रयत्नांचे कौतुक केले आहे.