राष्ट्रवादी युवती महाराष्ट्र अध्यक्षपदी सक्षणा सलगर
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी उस्मानाबादच्या जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सिदराम सलगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी उस्मानाबादच्या जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सिदराम सलगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. याआधी अध्यक्षपदी आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील होत्या. स्मिता यांचा विवाह उद्योजक आनंद थोरात यांच्याशी मे महिन्यात झाला.
सक्षणा सलगर यांच्या कामाची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची २०१६ मध्ये राज्याची स्टार प्रचारक म्हणून निवड केली होती. शिवाय त्या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही काम करत आहेत. राष्ट्रवादीच्या युवती संघटनेच्या स्थापनेपासून सक्षणा सलगर या संघटनेमध्ये काम करत आहेत. सक्षणा यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तेर गावातील एका सामान्य कुटुंबातील सक्षणा सलगर आहेत.
२०१२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत पहिल्यांदा तेरमधून निवडणूक लढविली. मात्र, त्यांना यश आले नाही. मात्र, गतवर्षी त्या पाडोळी गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यात. शेतकरी कुटुंबातील सक्षणा या आता राज्यपातळीवर काम पाहणार आहेत.