कंत्राटी परिचारिकांना ४५ हजारांऐवजी केवळ २५ हजार रुपयेच पगार
राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांचे खच्चीकरण करणारा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई : राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांचे खच्चीकरण करणारा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोरोनाचे संकट आहे. जिवावर उदार होवून अनेक परिचारिका काम करत आहेत. असे असताना त्यांना आता ४५ हजाराऐवजी केवळ २५ हजार रुपयेच वेतन मिळणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परिचारिकांमध्ये कमालीचा संताप आहे.
आज जागतिक परिचारिका दिन. आरोग्य विभागातील डॉक्टरांसह सर्वच परिचारिका प्राण पणाला लावून कोरोनाशी लढत आहेत. कोरोनाने ग्रासलेल्या रुग्णांनाही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी ही सर्व टीम झटत आहे. कंत्राटी अधिपरिचारिकाही जीवाची बाजी लावून काम करत आहेत.
मात्र त्यांच्या वेतनाबाबत सरकारने मनोबल खच्चीकरण करणारा निर्णय घेतला आहे. आता यापुढे ४५ हजारांवरून २५ हजार रुपयेच मानधन त्यांना मिळणार आहे. जागतिक परिचारिका दिन असलेल्या महिन्यापासूनच या आदेशाची अंमलबजावणी होत असल्याने या सर्व नर्सेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
रूग्णसेवेचं व्रत घेतलेल्या नर्सेस कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नेटानं लढत आहेत. अशा परिस्थितीत कर्तव्य आणि वात्सल्य यांच्यातली तारेवरची कसरत लिलया साधत, आज असंख्य सेवाव्रती झटत आहेत. असे असताना आरोग्य मंत्रालयाने असा का निर्णय घेतला, याचीच चर्चा होत आहे.