प्रशांत अंकुशराव, झी 24 तास, मुंबई: लोकांना गंडा घालण्यासाठी भामटे नेहमची वेगवेगळ्या आयडिया लढवतात. आमिषांना बळी पडून लोकही या भामट्यांच्या जाळ्यात अडकतात. स्वस्तात सायकल विकण्याच्या बहाण्यानं लोकांना फसवणा-या अशाच एका भामट्याला झी 24 तासनं शोधून काढलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही जमतारा वेब सिरीयल पाहिलीय का? अगदी तशाच पद्धतीनं मुंबईकरांना देखील गंडा घातला जातो आहे. तो देखील अगदी दिवसाढवळ्या अगदी तसाच प्रकार समोर आला आहे. 


गाड्या, सायकली, मोबाईल, प्रॉपर्टी स्वस्तात विकणे आहे. अशा फसव्या जाहिरातींचा सोशल मीडियावर अक्षरशः मारा सुरू आहे. या स्वस्तातल्या ऑफर पाहून कुणालाही त्या घेण्याचा मोह होतो. आणि इथूनच सुरू होतो मग फर्जीवाडा.



सैन्यदलात कामाला असून बदली झाल्यानं गाडी विकतोय, अशी बतावणी केली जाते. झी 24 तासनं अशाच एका ठगसेनाशी संपर्क साधला.पैसे द्या, गाडी आवडली नाही तर पैसे परत देऊ अशी बतावणी केली जाते. 


या ठग्यांच्या गोड बोलण्याला आणि कमी किंमतीला लोक बळी पडतात. तुम्ही एकदा पैसे भरलेत की, ते पैसे कायमचे बुडतात. तुम्हाला हवी असलेली वस्तू मिळत तर नाहीच, वर सैन्यदलाच्या नावानं आपली फसवणूक झाल्यानं मनस्ताप होतो. 


या ठगसेनांच्या विरोधात अनेकजण पोलिसात तक्रारी देखील करत नाहीत. त्यामुळं झारखंड, बिहार, पश्चिम बंगालसारख्या दूरच्या ठिकाणी बसलेल्या या भामट्यांचं चांगलंच फावतं.


सैन्यात असल्याचं सांगून फसवणूक करणारी अशीच टोळी सध्या धुमाकूळ घालत आहे. त्यामुळं आपल्याला आवडलेली ऑफर फसवी तर नाही ना, याची प्रत्येकानं पुरेशी खबरदारी घेणं गरजेचं आहे.