Samana editorial : भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत गणपती दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला संपवून मुंबईवर ताबा मिळवायची हीच संधी आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला आहे त्यांंना शिक्षा मिळायलाच हवी असं म्हटलं होतं. याचाच धागा पकडत शिवसेनेच्या अग्रलेखातून भाजपवर अमित शहांवर निशाणा साधण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटास बेकायदेशीरपणे राजसिंहासनावर बसवून त्यांनी ईप्सित साध्य केलं. त्यांचे हास्य विकट आहे. उद्धव ठाकरे व शिवसेनेस गाडण्याची भाषा महाराष्ट्रविरोधी आहे. बाळासाहेब ठाकरेंशी व त्यांच्या विचारांशी बेईमानी आहे. अमित शहा मुंबईत येऊन अशा विषाची पेरणी करतात व भाजपमधील 'मऱहाठे' त्यावर टाळया वाजवतात. भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र अमित शहांनी शिवसेना गाडण्याची व ठाकऱ्यांना धडा शिकविण्याची भाषा सतत करीत राहावे. त्यातूनच नव्या दमाचे वीर, योद्धे निर्माण होतील. स्वतःस शिंदे गट म्हणवून घेणाऱ्यांनी तर स्वाभिमानाची सुंताच करून घेतली आहे! ते निद्रिस्त आहेत. पण 'मऱ्हाठा' नक्की उठेल, असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. 


केंद्रातले 'यूपीए' सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी आणि पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. हा गौप्यस्फोट नसून सत्य आहे. आणखी एका प्रकरणात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 'सरकार' पद्धतीने भूमिका करून अमित शहा यांना त्या काळात मदत होईल अशी व्यवस्था केली. या दोन्ही प्रसंगांवर स्वतंत्र लिखाण संजय राऊतच करू शकतील, असंही अग्रलेखात सांगण्यात आलं आहे. 


दरम्यान, अमित शहा आणि भाजपचे 'मिशन मुंबई' काय आहे त्याचा भयंकर चेहरा उघडा पडला. अमित शहा व त्यांच्या लोकांनी अशा प्रकारची भाषणे पुनपुन्हा करीत राहिली पाहिजेत. त्यातूनच जनमनाचा उद्रेक होईल. शिंद गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि राज ठाकरे यांना चुचकारून त्यांनी मुंबईवर नियंत्रण मिळवण्याचं ठरवलं असल्याचं म्हणत अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला.