मुंबई : 'विरोधकांना शिवसेना-भाजपा युतीशी सामना करायचा नाही. त्यांना आपापसात लढायचं आहे. कौरवांतच युद्ध माजलंय. मोदी पुन्हा सत्तेत आले तर लोकशाहीचा ते गळा घोटतील, असं सांगणारे विरोधकच एकमेकांचे गळे घोटताना दिसत आहेत. वंचित समाजातल्या जनतेला प्रकाशकिरणं दाखविण्यासाठी ज्यांनी आघाड्या उभ्या केल्या ते विरोधकच वंचित आणि शोषितांच्या रांगेत कटोरे घेऊन उभे आहेत.' अशा शब्दांत शिवसेनेनं सामनामधून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीवर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत स्वबळाचा नारा देण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाने आढावा बैठक घेतली होती. पण या बैठकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सूर आळवण्यात आला. आघाडी असतानाही मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसला मदत करत नाहीत, अशी तक्रार पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची मागणी बैठकीत करण्यात आली होती.


प्रकाश आंबेडकरांना जेव्हा काँग्रेससोबत जाणार का असा प्रश्च विचारण्यात आला तेव्हा त्यांनी याबाबत आताच सांगता येणार असं म्हटलं. पण लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे असा आरोप काँग्रेसने केला होता. त्यामुळे काँग्रेससोबत प्रकाश आंबेडकर जाणार का याबाबत देखील शंका आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून यावर ही टीका करण्यात आली आहे.