कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : 'संघर्षाला हवी साथ'मध्ये शीतल बोकडेच्या संघर्षाची गोष्ट आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय गरीब परिस्थिती असताना शीतलनं परिस्थितीची जाण ठेवत अभ्यास केला... महापालिकेच्या शाळेत शिकलेल्या शीतलला दहावीच्या परीक्षेत ९२.४० टक्के मिळवलेत... आई-वडील पोटाला चिमटे काढून मुलांचं शिक्षण करतायत... पण शीतलची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची साथ गरजेची आहे. 


प्रभादेवी परिसरातल्या कामगार नगरची ही झोपडपट्टी... इथल्याच एका झोपडीच्या वरच्या भागात भाड्यानं बोकडे कुटुंबीय राहतात... एकाच खोलीत हॉल, बेडरुम, किचन... इथेच राहून शीतलनं अभ्यास केला आणि तब्बल ९२.४० टक्के मिळवले.... शीतलचे वडील दादर फूल मार्केटला रोजंदारीवर काम करतात तर आई कविता बोकडे घरबसल्या तयार कपड्यांचे धागे काढण्याचं काम करते... दोन वेळच्या खाण्याचा खर्च कसाबसा निघतो... त्यातच मोठ्या मुलाच्या बीएससी आयटीसाठी ६० हजारांचं कर्ज डोक्यावर आहे... पण मुलांसाठी आई वडील वाट्टेल तसे कष्ट करतायत... मुलांनी चांगलं शिकावं म्हणून वडील रोज चौदा, पंधरा तास काम करतात.


घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून शीतलनं अतिशय नेटानं अभ्यास केला... तिला घवघवीत यश मिळालं... आता पुढे तिला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन शास्त्रज्ञ होण्याची इच्छा आहे.
  
शीतल महापालिकेच्या प्रभादेवी म्युन्सिपल सेकंडरी स्कूलची शाळेत शिकली... कुठलाही क्लास नाही... हुशार आणि होतकरू असलेल्या शीतलचं शिक्षण पैशासाठी थांबू नये, अशी इच्छा शीतलच्या शिक्षकांनी - निवास शेवाळे यांनी व्यक्त केलीय.  


जन्मापासूनच गरीबीचे चटके सहन करणाऱ्या शीतलच्या डोळ्यांत मोठी स्वप्न आहेत. तिला तिची स्वप्न पूर्ण करायची आहेत... या हुशार शीतलला तुमच्या शुभेच्छाही हव्यात आणि तिच्या संघर्षाला साथही... 


या गुणवंतांना सढळ हस्ते मदत करण्यासाठी तुम्हीही पुढे या.... त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या नावानंच चेक काढा... 


संपर्कासाठी :


झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड, मधू इंडस्ट्रीयल इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई - ४०० ०१३


संपर्क : 022 - 24827821


ई-मेल : response.zeemedia@gmail.com