संजय निरुपम यांचा मनसेला इशारा
विक्रोळीमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.
मुंबई : विक्रोळीमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या हल्ल्यात विक्रोळी मनसेचे उपविभाग प्रमुख विश्वजित ढोलम हे जखमी झाले असून त्यांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हल्लेखोर फेरीवाले असल्याचा आरोप
दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचा इशारा देणारी पत्रके वाटत असताना त्यांना मारहाण करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. हल्लेखोर हे फेरीवाले असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.
निरुपम यांचा मनसेला इशारा
मनसे कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मनसेला इशारा दिला आहे. पुन्हा मनसेच्या गुंडानी मार खाल्ला. मनसेने आता गुंडगिरी सोडून द्यावी. आमचा हिंसेवर विश्वास नाही. मात्र गरीब फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना मारहाण केली तर अशीच प्रतिक्रिया उमटणार, असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.
राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांवर भडकले
विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी कु्ष्णकुंजवर विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत राज यांनी पक्षाच्या पदाधिका-यांची कानउघडणी केल्याची माहिती समोर येतेय.
आंदोलनात पक्षाच्या पदाधिका-यांना विरोधी गटाकडून होत असलेल्या मारहाणीबद्दल राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केल्याचंही बोललं जातंय. आंदोलनांमध्ये मला मार खाणारे नाहीत, तर मार देणारे कार्यकर्ते अपेक्षित असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी नुकतीच व्यक्त केली होती.
येत्या शुक्रवारी अनधिकृत फेरीवाला प्रकरणात मनसे पदाधिका-यांना न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पत्र दिले जाणार आहे. ते पत्र स्थानिक महापालिका आणि पोलीस अधिका-यांना देऊन अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईवर लक्ष ठेवण्याच्या सूचना राज यांनी दिल्यात.
अमित ठाकरेंनी घेतली जखमी कार्यकर्त्यांची भेट
या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी रात्री उशिरा रुग्णालयात जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस केली. फेरीवाल्यांना हटवण्याच्या मुद्दयावरुन मनसे आणि फेरीवाले यांच्यात सुरु असलेल्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वी मालाड परिसरात मनसे विभाग प्रमुखाला फेरीवाल्यांनी मारहाण करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता पून्हा एकदा मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे.