मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी दिलेल्या राजीनाम्यावर संजय निरुपम यांनी टीका केली आहे. मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष निवड करण्याऐवजी मुंबई काँग्रेस चालवण्यासाठी ३ सदस्यीय समितीची नेमणूक करा, ही मागणी योग्य नाही. यामुळे काँग्रेसची अवस्था आणखी खराब होईल, असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं. पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ३ सदस्यीय समितीची नेमणूक करण्याची मागणी मिलिंद देवरांनी राजीनाम्यानंतर केली होती.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राजीनामा हा त्यागाच्या भावनेतून दिला जातो. इकडे दुसऱ्या क्षणी राष्ट्रीय पातळीवरचं पद मागितलं जात आहे. हा राजीनामा आहे का वरती जायची शिडी? पक्षाला अशा कर्मठ लोकांपासून सावध राहिलं पाहिजे,' असा टोला संजय निरुपम यांनी मिलिंद देवरा यांना लगावला.



लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये पुढील राष्ट्रीय भूमिका स्वीकारण्यासाठी देवरा दिल्लीत जाऊ शकण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या राजीनाम्यासंदर्भातील एक पत्र नुकतेच देवरा यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे सुपुर्द केल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात काँग्रेससाठी भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीच्या प्रभावाचा निषेध करणं हे काँग्रेससाठी एक मोठं आव्हान आहे, असे त्यांनी राजीनामा देताना स्पष्ट केलं आहे.