भोंगे, हनुमान चालीसा यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन, संजय राऊत यांचा आरोप
राणा अचानक रामभक्त कसे झाले? हनुमान भक्त कसे झाले? ते इतके भक्त झाले की मुंबईत वातावरण बिघडविले.
मुंबई : नवनीत राणा ( Navneet Rana ) यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा एक पुरावा समोर आला आहे. राणा अचानक रामभक्त कसे झाले? हनुमान भक्त कसे झाले? ते इतके भक्त झाले की मुंबईत वातावरण बिघडविले. भोंगे प्रकरण, हनुमान चालीसा यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केलाय.
१९९३ च्या दंगलीमध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन, माफिया कनेक्शन होते. तोच प्रकार आता होताना दिसत आहे. गेलं १५ दिवस जे काही महाराष्ट्रात होतं दिसतंय भोंगे प्रकरण, हनुमान चालीसा प्रकरण यामागे अंडरवर्ल्ड 'डी' गॅंग असल्याचं समोर येतंय असे ते म्हणाले.
दाऊद गँगशी संबंध असणारे युसुफ लकडावाला ( Yusuf Lakdavala ) यांच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचं कर्ज घेतलं. युसुफ लकडावाला याला २०० कोटी मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक झाली होती. तुरुंगात असतानाच त्याचा मृत्यू झाला होता.
लकडावाला याची चौकशी सुरु असताना त्या चौकशीत नवनीत राणा यांना कर्ज दिल्याची माहिती समोर आली नाही का? आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराकडून पैसे घेतल हे EOW च्या तपासात कळले नाही? मग, EOW ने कसली चौकशी केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मंत्री नवाब मलिक ( Navab Malik ) यांनी जमीन खरेदी केली. त्यांना दाऊदशी संबंध असल्याचा आरोपावरून ईडीने अटक केली. मग, तोच न्याय राणा यांना का लावला नाही? अनिल देशमुख, नवाब मलिक यांची चौकशी झाली मग राणा सुटले कसे? त्यांच्या मागे कोणती आंतरराष्ट्रीय शक्ती आहे?
मुख्यमंत्री यांना भेटून काल अनेक प्रकरणे पुराव्यासह दिली आहेत. त्याची आता चौकशी होईल, असेही राऊत यांनी सांगितले.