संजय राऊत यांच्याकडून राज्यपाल पुन्हा लक्ष्य
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा लक्ष्य केले
कृष्णात पाटील, मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यास विलंब लावणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा लक्ष्य केले आहे. या मुद्यावरून भाजप नेत्यांनीही राऊत यांना लक्ष्य केलं असून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी आज पुन्हा राज्यपालांना लक्ष्य केलं. राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पाय खेचण्याचे काम सुरु आहे. राज्यपाल यांनी येथून बदनाम होऊन जाऊ नये. १२ दिवस उलटूनही फाईलवर का सही केली जात नाही? ती काय भ्रष्टाचाराची फाईल आहे का? राजभवन राजकारणाचा अड्डा बनू नये. तसंच इतरही काही अड्डे आहेत, तिथे त्यांनी पत्ते पिसत बसावेत.
राऊत यांनी भाजपवरही हल्ला चढवला. ते म्हणाले, २८ तारखेनंतरही मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच राहतील. विरोधी पक्षाचा जो जळफळाट सुरु आहे. त्यात तेच जळून खाक होतील. अशा संकटात एकत्र येऊन काम करायला हवे. परंतु यांना मात्र राजकारण सुचत आहे.
राणेंनाही राऊतांचे उत्तर
संजय राऊत यांनी रविवारी ट्वीट करून राज्यपालांवर निशाणा साधला होता. त्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली होती. राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे याची संजय राऊत यांना माहिती नाही काय? सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते. आज आहे आणि उद्या नाही. समजने वालों को इशारा काफी है!, असे राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले होते.
नारायण राणे यांनी केलेल्या टीकेलाही राऊत यांनी उत्तर दिले. काहीजण टीका करून लक्ष वेधून घेत असतात. टीकेचा अर्थ समजून घेतला पाहिजे, वाचलं पाहिजे, इतिहास समजून घेतला पाहिजे. अशा टीकेला मी किंमत देत नाही, असे राऊत म्हणाले.
आशिष शेलार यांची राऊत यांच्यावर टीका
राज्यपालांवर राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. ट्वीटरवर शेलार म्हणाले, राजभवनाकडे तोंड करून काल पत्रपंडित काहीतरी बोलले म्हणे. काय होतं ते ? आम्ही अगोदर नाव दिले नाही. यवतमाळ पोटनिवडणुकीत विसरलो. हे सांगायचे आहे की, राज्यपालांवर आता दबाव आणायचाय? इथे पत्रपंडित बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते. समजनेवालो को इशारा काफी.....
माननीय राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना लोकशाहीने जे अधिकारी दिले आहेत, त्यानुसार ते निर्णय घेतील. दबाव कशाला आणताय? लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना, मग आता लोकशाहीने वागा. पत्रपंडितांनी अकलेचे तुणतुणे वाजवण्याची गरज काय? राजभवनाच्या नावाने बोंबा मारायला शिमगा आहे का? असा टोला शेलार यांनी लगावला.