पंढरपुरातील आंदोलनावरुन संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर टीका
पंढरपूर मंदिराच्या बाहेर लोकांना वेठीस धरु नये असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबई : प्रकाश आंबेडकरांचं मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की, मंदिर बंद ठेवणं हे कोणी आनंदाने करत नाहीयेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकार हे टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी उघड्या करत आहेत. भविष्यात लवकरच मंदिराचा विषय, रेल्वे सुरु करण्याबाबत चर्चा आहे. पण विरोधी पक्षाने सुद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी थोडा संयम बाळगला तर महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार होतील.'
'आज ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांनी ज्याप्रकारे गर्दी जमवली आहे. ती रेटारेटी सुरु आहे. हे चित्र चांगलं नाही. पंढरपुरच्या विठोबाच्या दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्र आसुसलेला आहे. फक्त बाहेर आंदोलक आहेत ते नाहीत. कोरोना काळात सोशल डिस्टंसिंग महत्त्वाचं आहे. हजारो लोकं जमले आहेत ज्यामुळे धोका वाढू शकतो. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. असं देखील राऊतांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकरांवर टीका
'आम्ही नियम मोडण्यासाठी आलेलो आहेत. असं म्हटलं जात आहे. प्रकाश आंबेडकर हे एक संयमी नेते आहे. ते कायद्याचे अभ्यासक आणि जानकार आहेत. ज्यांनी या देशाला कायदा आणि घटना दिली. त्यांचं ते वारसदार आहेत. अशा प्रमुख व्यक्तीकडून आरोग्य विषयक आणीबाणी असताना कायदे भंगाची किंवा नियम भंगाची भाषा करणं हे म्हणजे लोकांना हुसकवण्या सारखं आहे. तरी मला खात्री आहे. यावर मुख्यमंत्री आणि विरोधक मार्ग काढतील.' अशी टीका त्यांनी केली आहे.