Sheetal Mhatre Prakash Surve Video Case: शिवसेनेच्या (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या) प्रवक्त्या शीतल म्हात्रेंच्या मॉर्फ व्हिडीओ (Sheetal Mhatre Prakash Surve Video) प्रकरणावरुन शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. दरम्यान या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शीतल म्हात्रे आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याविरोधातच सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यावरुन शीतल म्हात्रेंनीही संजय राऊतांना टोला लगावला आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत शीतल म्हात्रेंनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.


राऊत काय म्हणाले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संबंधित व्हायरल व्हिडीओ खरा आहे की खोटा आहे याचा तपास लावा. जर तो व्हिडीओ खरा असेल तर जाहीर कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे कोणी अश्लील वर्तन करुन समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करणार असतील तर खरं म्हणजे यांच्यावरच इंडियन पिनल कोडच्याअंतर्गत जी कलमं आहेत त्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल व्हायला हवेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाचा महाविकास आघाडीतील कोणत्याही घटकपक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याशी काहीही संबंध नसल्याचंही राऊत म्हणालेत.


मी व्हिडीओ पाहिलेला नाही


"हा जो काही वादग्रस्त व्हिडीओ आहे याच्याशी महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा काडीमात्र संबंध नाही. तुमची पापं लपवण्यासाठी, तुमचेचे गुन्हे लपवण्यासाठी तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकणार असाल तर ते काय कायद्याचं राज्य नाही. मी तो व्हिडीओ पाहिलेला नाही. सकाळी माझ्या वाचनात आलं होतं. मुळात अशाप्रकारचं अश्लील वर्तन कोणी करत असेल सार्वजनिक कार्यक्रमात तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे," अशी मागणी राऊत यांनी केली आहे.


नक्की वाचा >> SIT स्थापनेनंतर थेट रश्मी ठाकरेंचा उल्लेख करत शीतल म्हात्रे म्हणाल्या, "रश्मी वहिनी कदाचित.."


शीतल म्हात्रेंचं राऊत यांना उत्तर


दरम्यान, संजय राऊत यांनी शीतल म्हात्रेंवरच अश्लील कृत्य केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केल्यानंतर शीतल म्हात्रेंनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शीतल म्हात्रेंनी, "ज्यांनी मला अग्निकन्या म्हटलं होतं त्या संजय राऊत यांनी असं म्हटलं आहे की ही अश्लील कृती आहे, त्यांना तुम्ही अटक करा. तर संजय राऊतजी आपले सुद्धा व्हिडीओ आहेत. आपण सुद्धा महिलांशी कशापद्धतीने बोललात याचे व्हिडीओ आजही युट्यूबवर आहेत. अशा व्यक्तीने माझ्याबद्दल असं बोलावं म्हणजे यांची काय मानसिकता आहे. कुठल्या महिलांना सन्मान देणार?" असा सवाल विचारला आहे.


बाळासाहेब असते तर...


तसेच संजय राऊत यांना उद्देशून शीतल म्हात्रेंनी, "कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता. कुठे बाळासाहेबांचं नाव घेता. आज बाळासाहेब असते तर आज महिलांना अशापद्धतीने वागवलं गेलं नसतं याची मला खात्री आहे," असंही म्हटलं आहे.