`दिल्लीत छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, भाजप आणि संभाजी भिडे शांत का?`
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?
मुंबई: भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेच्या शपथविधीवेळी घडलेल्या प्रसंगावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. या वादात आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली-सातारा बंदची अदयाप घोषणा नाही, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.
'भाजपला शिवाजी महाराज केवळ निवडणुकांपुरते हवे असतात'
तत्पूर्वी काँग्रेस नेते भाई जगताप यांनीदेखील या मुद्द्यावरून भाजपचा चांगलाच समाचार घेतला. भाजपला शिवाजी महाराज केवळ निवडणुकांपुरते हवे असतात, अशी टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीचे नाव घेतलेले तुम्हाला चालणार नाही? तुमचं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम बेगडी आहे, हे आम्हाला माहिती आहे. शिवाजी महाराज तुम्हाला केवळ निवडणुकांपुरतेच हवे असतात. व्यंकय्या नायडू यांचा जाहीर निषेध, असे भाई जगताप यांनी म्हटले होते.
काल दिल्लीत राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.