मुंबई : सामनाच्या रोखठोक या विशेष संपादकियातून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपचा मुख्यमंत्री पुन्हा नको ही सर्वांचीच भूमिका असल्याचं राऊतांनी या लेखात लिहिलं आहे. तसेच भाजपचा उल्लेख हिटलर असा केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही सत्तास्थापनेचा तिढा कायम आहेय. भाजप-शिवसेना यांच्यात दरी वाढली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही काहीही स्पष्ट झालेलं नाही. राज्यपाल बी.एस. कोश्यारी यांनी शनिवारी संध्याकाळी भाजपला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. त्यातच आज पुन्हा एकदा सामनातून भाजपला लक्ष्य करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पाच वर्षे इतरांना भीती दाखवून राज्य करणारी मंडळी आज स्वतःच दहशतीखाली आहेत. हे उलटे आक्रमण झाले आहे. भीती दाखवूनही मार्ग सापडत नाही आणि पाठिंबा मिळत नाही असे जेव्हा घडते तेव्हा एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, हिटलर मेला आहे व गुलामीचे सावट दूर झाले आहे. पोलीस व इतर तपास यंत्रणांनी यापुढे तरी निर्भयपणे काम करावे!' या निकालाचा हाच अर्थ आहे! असं या लेखात म्हटलं आहे.


'महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम नाही'


'महाराष्ट्राचे राजकारण महाराष्ट्रातच व्हावे. महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम नाही. इकडले निर्णय इकडेच व्हावेत. निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे आशीर्वाद दिले, पण पंधरा दिवसांनंतरही श्री. फडणवीस शपथ घेऊ शकले नाहीत. कारण अमित शहा राज्यातील घडामोडींपासून अलिप्त राहिले आहेत. युतीतला सगळय़ात मोठा पक्ष शिवसेना मावळत्या मुख्यमंत्र्यांशी बोलायला तयार नाही हा सगळय़ात मोठा पराभव. त्यामुळे दिल्लीचे आशीर्वाद लाभूनही घोडय़ावर बसता आले नाही.'


'महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे उद्धव ठाकरे ठरवतील. राज्याचे मोठे नेते शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरेल व राज्यातील काँग्रेसचे अनेक आमदार सोनिया गांधींना भेटून आले. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रावर सोपवा असे त्यांनीही सोनियांना सांगितले. काही झाले तरी पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री नको हा महाराष्ट्राचा एकमुखी सूर आहे.' असं देखील सामनातून म्हटलं आहे.