आता इंद्राचं आसन दिलं तरी नको- संजय राऊतांचा भाजपला टोला
`मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत`
मुंबई : राज्यात पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं, राज्याचं नेतृत्व करावं अशी जनतेची, सर्व शिवसैनिकांची इच्छा असून त्याला तिन्ही पक्षांची सहमती असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली आहे. शिवसेनेला भाजपकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याचंही ते यावेळी म्हणाले. तसंच मुख्यमंत्रिपद काय इंद्रपद दिलं तरी माघार घेणार नसल्याची रोखठोक भूमिका राऊतांनी मांडली.
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाल्यानं आता मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत उद्धव ठाकरे बसणार का याकडेच साऱ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. झी २४ तासनं बुधवारी संध्याकाळी सत्तेचा हा फॉर्म्युला सर्वात आधी दाखवला होता. त्यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे.
मुंबईत आज तीनही पक्षांच्या आमदारांच्या बैठकांचा धडाका आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सकाळी १०.३० वाजता शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक होणार आहे. मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत शिवसेनेची सत्तास्थापनेची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार आहे.
महाविकासआघाडीचा सत्ता फॉर्म्युला निश्चित झालेला आहे. आज मुंबईत तीनही पक्षांच्या स्वतंत्र बैठका असून त्यानंतर एक संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तेच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासह ११ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपद बहाल करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीला ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदं देण्यात येतील. काँग्रेसला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपद देण्यात येतील. तर विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे.