संजय राऊत यांचा सूर मवाळ? भाजपवर टीका न करताच पत्रकार परिषद आटोपली
यावेळी राऊत नेहमीप्रमाणे भाजपला नवा इशारा देतील अशी अपेक्षा होती.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून दररोज पत्रकारपरिषद घेऊन भाजपवर आगपाखड करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांचा सूर सोमवारी मवाळ झालेला दिसला. संजय राऊत आज राज्यपालांच्या भेटीला जाणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी राऊत यांनी पत्रकारपरिषद घेतली होती. यावेळी राऊत नेहमीप्रमाणे भाजपला नवा इशारा देतील अशी अपेक्षा होती. मात्र, राऊत यांनी केवळ राज्यपालांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती देत पत्रकार परिषद आटोपती घेतली. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
मात्र, संजय राऊत यांनी आज सकाळी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत राऊत यांनी 'लक्ष्य तक पहुचने से पहले सफर मे मजा आता है' असा संदेशही लिहला आहे. त्यामुळे आता राऊत यांच्या या फोटोमागील नेमका अर्थ काय, याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने समसमान सत्तावाटपासाठी आग्रह धरला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यात अशी कोणतीही बोलणी झाली नव्हती, असे सांगत शिवसेनेची मागणी धुडकावून लावली होती. यानंतर शिवसेना कमालीची आक्रमक झाली. संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून पत्रकारपरिषद आणि ट्विट करण्याचा सपाटा लावला असून ते दररोज भाजपला नवनवे इशारे देत आहेत. कालच झालेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी शिवसेनेकडे १७० पेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा केला होता. त्यामुळे आमचा मुख्यमंत्री शिवतीर्थावरच शपथ घेईल, असेही राऊत यांनी म्हटले होते.