मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या तानाजी चित्रपटातील मॉर्फिंग केलेली क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा मॉर्फ केल्याने वाद निर्माण झाला आहे. या वादात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की, ही चित्रफित मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यांना पाठवली आहे व त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहतो आहे. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली येथे बंद पुकारणारे आता काय प्रतिक्रिया देतात, ते मला पाहायचे आहे. त्यानंतरच आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ. इतक्या जणांना ही चित्रफित पाठवल्यानंतरही कुणाचीही एका ओळीचीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या, असा खोचक सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 


शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा चेहरा लावल्याने वाद


यापूर्वी भाजप नेते जय भगवान गोयल यांचे 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी संजय राऊत यांनी छत्रपतींचे वंशज यावर काय बोलणार, असा सवाल करत उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले आणि संभाजीराजे यांना लक्ष्य केले होते. यानंतर उदयनराजे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा प्रतिवाद करताना छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते. त्यामुळे राऊत यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.