मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून निवडणूक लढली. आमचे मुद्दे आम्ही लोकांसमोर ठेवले. त्यावर जनमत मिळाले. जे सत्तास्थापनेसाठी पुरेसे नाही. ते असते तर आम्ही इतका वेळ वाट पाहिली नसती असे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार चुकीचं काय बोलले ? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार आम्ही बनवत नाही असं काही चित्र नाही आहे. 105 ज्यांच्या आकडा आहे त्यांनी सरकार बनवावे असे टोला त्यांनी यावेळी भाजपाला लगावला आहे. नेहमी सविस्तर मुलाखत करणाऱ्या संजय राऊत यांनी यावेळी केवळ ३० सेकंदाच्या आत पत्रकारांशी बातचीत संपवली. 



राष्ट्रवादीला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला असे पवारांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता भाजपाला सोडून सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेची कोंडी झाल्याचे उघड आहे. 


काँग्रेसमधील राज्यातील नेते शिवसेनेसोबत सकारात्मक झाले होते. त्यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर पवारांनी देखील सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पण त्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया देत आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिल्याचे सांगितले. ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने प्रतिक्रिया दिली आहे आणि राष्ट्रवादीने भूमिका बदलली त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्यामुळे भाजपा सोबत हातमिळवणी करावी किंवा वेगळा संसार मांडावा याशिवाय शिवसेनेसोबत दुसरा पर्याय नसल्याचे स्पष्ट होत आहे.