पायपीट करणाऱ्या मजुरांची अवस्था पाहून राऊत व्यथित; राज्य सरकारला दिला `हा` सल्ला
अनेक लोक चालताना आजारी पडत आहेत, मरत आहेत. तरीही या लोकांनी चालणे थांबवले नाही.
मुंबई: लॉकडाऊनमुळे गावाकडे परतत असलेल्या मजुरांची अवस्था पाहून व्यथित झालेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला एक सल्ला दिला आहे. त्यांनी रविवारी ट्विट करून म्हटले की, राज्य सरकारने प्रवासासाठी खासगी वाहनांना परवानगी द्यावी. मजूरवर्ग रस्त्यावरून चालत निघाला आहे, हे चित्र चांगले नव्हे. त्यांच्यासोबत लहान मुलेही आहेत. अनेक लोक चालताना आजारी पडत आहेत, मरत आहेत. तरीही या लोकांनी चालणे थांबवले नाही. बेकायदेशीरपणे ते आपापल्या गावांकडे मार्गक्रमण करतच आहेत. रेल्वे या लोकांसाठी गाड्या सोडायला तयार नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने तरी पुढाकार घेऊन खासगी वाहनांना परवानगी देणे गरजेचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये १६ मजुरांना मालगाडीने चिरडल्याची घटना घडली होती. हे मजूर जालन्याहून चालत निघाले होते. चालून दमल्यानंतर हे मजूर रेल्वे ट्रॅकवर झोपी गेले. तेव्हाच अचानक आलेल्या मालगाडीने या सर्वांना चिरडले. यामुळे मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
नाशिकमध्ये पायी चालत जाणाऱ्या मजुरांसाठी विशेष बसची व्यवस्था
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागातून सध्या परराज्यातील मजुरांसाठी रेल्वेगाड्या सोडल्या जात आहेत. मात्र, या गाड्यांची संख्या पुरेशी नसल्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या सगळ्यात मजुरांची फरफट सुरुच आहे.