मुंबई: राज्यात सत्तास्थापनेची मुदत संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना मुंबईत राजकीय हालचालींनी वेग पकडला आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील तिढा काही केल्या सुटायला तयार नाही. काल भाजपकडून शिवसेनेला नव्याने चर्चा करण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकारपरिषद घेत शिवसेना कोणत्याही नव्या प्रस्तावावर चर्चा करणार नाही, जे ठरलंय तेच होईल, असे सांगत ही ऑफर साफ धुडकावून लावली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर संजय राऊत थेट मुंबईतील शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकच्या दिशेने रवाना झाले आहेत. संजय राऊत यांनी पत्रकारपरिषदेत महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रपती राजवट येऊ देणार नाही, असा इशाराही दिला होता. त्यामुळे राऊतांच्या शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर शिवसेना मोठा निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


तत्पूर्वी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनीदेखील आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवारच सध्या राज्याला संकटातून बाहेर काढू शकतात, असे सांगितले. त्यामुळे सत्तास्थापनेबाबतची उत्सुकता कमालीची शिगेला पोहोचली आहे.


गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शरद पवार यांच्यातील जवळीक चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलत असू तर तो अपराध ठरतो काय? त्यांना सगळ्यांनी भेटावं. सध्या शरद पवार यांच्याशी कोण कोण बोलत आहे, या सर्वाची माहिती आपल्याकडे आहे. तसेच मी शरद पवार यांना भेटल्यानंतर ज्यांच्या पोटात पोटशूळ उठला होता तेदेखील पवारांना कसा आणि कुठे संपर्क साधू पाहत आहेत, हेदेखील मला पक्के ठाऊक असल्याचे राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत म्हटले होते.