मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल विभागात पहिला पदवीधर तृतीयपंथी
संतोष लोंढे यांनी एम.ए साठी प्रवेश घेतला आहे
गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल विभागात पहिला तृतीयपंथी पदवीधर झाला आहे. आपली, आपल्या समाजाची प्रगती फक्त शिक्षणातूनच होणार आहे, हे जेव्हा संतोष लोंढे यांना समजलं तेव्हा त्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण करत, एक आदर्श उदाहरण इतर तृतीयपंथीयांसमोर ठेवलं आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल विभागातून संतोष लोंढे पहिले तृतीयपंथी आहेत, ज्यांनी आपलं पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण करत बी.ए ची पदवी मिळवली आहे. इतकंच नाही तर पुढील शिक्षणासाठी त्यांनी एम.ए साठी प्रवेश घेतला आहे
संतोष सध्या वंचित मुलांना शिकवण्याचं काम करतात. तर दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत सर्किट डिझाइनचं पार्ट टाइम काम करतात. हे करत असताना मानसशास्त्रची पदवीही त्यांनी मिळवली आहे. यासाठी प्रवेश नोंदणी करताना त्यांनी पुरुष किंवा महिला पर्याय म्हणून न देता एक तृतीयपंथी म्हणून प्रवेश घेतला.
शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतं. मात्र तृतीयपंथी समाज अजूनही शिक्षणात मागे आहे. या तृतीयपंथीयांसाठी असे संतोष निर्माण होऊन त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देणं ही काळाची गरज ठरत आहे.