मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी घुसून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. चिथावणीखोर भाषण करत कामगारांची माथी भडकवल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी काल सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आज सातारा पोलिसांनी (Satara Police) सदावर्ते यांना ताब्यात घेतलं आहे.  काल रात्रीच सातारा पोलीस मुंबईत दाखल झाले होते.  60 ते 70 पोलिसांच्या बंदोबस्तात सदावर्ते यांना साताऱ्याकडे नेण्यात येत आहे. सदावर्ते यांच्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 


साताऱ्यातलं प्रकरण काय?
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सदावर्ते यांनी छत्रपती घराण्यासंदर्भात बदनामी करणारं वक्तव्य केलं होतं. तेढ निर्माण होईल, असं ते वक्तव्य असल्याने त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. दीड वर्षांपूर्वीची ही तक्रार असून त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. आता या गुन्ह्याप्रकरणी सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतलं आहे. 


सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी
गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी बुधवारी संपली. त्यानंतर त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. सरकारी वकीलांनी सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा मागणी केली. पण याप्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे, सदावर्ते यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचां सांगत सदावर्ते यांच्या वकीलांना जोरदार विरोध केला.


न्यायालयाने ही बाजू ग्राह्य धरून सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी अटक करण्यात आलेले इतर आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.