Satyajit Tambe : एका फोनमुळे सत्यजित तांबेंना भाजपची उमेदवारी मिळाली नाही; इनसाईड स्टोरी
सत्यजीत तांबे भाजपच्या वाटेवर असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तसेच भाजप त्यांना उमेदवारी देऊ शकतं अशीही चर्चा रंगली होती. मात्र, नाशिकमधून सत्यजित तांबेंना भाजपची उमेदवारी का मिळाली नाही? या मागची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
Maharashtra Politics: नाशिक पदवीधर मतदार संघाच्या ( Nashik Graduate Constituency Election ) निवडणुकी आधीच राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली (Maharashtra Political News). यानंतर राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या. यानंतर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यानंतर सत्यजीत तांबे भाजपच्या वाटेवर असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तसेच भाजप त्यांना उमेदवारी देऊ शकतं अशीही चर्चा रंगली होती. मात्र, नाशिकमधून सत्यजित तांबेंना भाजपची उमेदवारी का मिळाली नाही? या मागची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
सत्यजित तांबे हे भाजपचे उमेदवार नको म्हणून बाळासाहेब थोरातांनी भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सत्यजित तांबेंना भाजप उमेदवारी देणार अशी चर्चा सुरुवातीपासूनच नाशिक आणि नगरच्या राजकारणात रंगली होती. मात्र, सत्यजित तांबेंचा भाजप प्रवेश रोखण्यात बाळासाहेब थोरातांनी मध्यस्थी केल्याचं आता समोर आले आहे.
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याला थोरातांनी फोनवरुन सत्यजित तांबेंना तिकिट न देण्याची विनंती केली. हा आमचा कौटुंबिक मुद्दा आहे, तो कुटुंबातच सोडवतो ही भूमिका त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला फोनवरुन सांगितली. यानंतर सत्यजित तांबेंचा भाजप प्रवेश थांबवण्यात थोरातांनीच महत्त्वाची भूमिका बजावल्याचं आता स्पष्ट होत आहे.
सत्यजीत तांबेनी काँग्रेसला धोका दिला - नाना पटोले
तांबेंनी काँग्रेसला धोका दिला असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या सर्व घटनांचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेला आहे. त्यामुळे कारवाईबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी भाजपवरही टीकेची झोड उठवली.
कोण आहेत सत्यजीत तांबे ?
सत्यजीत तांबे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय आहेत. नगररचना, नागरी व्यवस्थापन यासंदर्भातील त्यांचं सिटीझनविल हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. सेंटर फॉर इंडिया इंटरनॅशनल रिलेशन्स या संस्थेचे ते अध्यक्ष देखील आहेत. तांबे यांनी एनएसयुआयनंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये काम केलं. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. यानंतर सत्यजीत तांबे यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं अध्यक्षपदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली. युवक काँग्रेसचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर राज्यभरात युवकांचं संघटन करण्यात त्यांनी मह्तावची भूमिका बजावली.