मुंबई: सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पेचात पडलेल्या फडणवीस सरकारपुढील अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. 'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या १० महिन्यांपासून हा कार्यक्रम प्रसारित न होऊनही सरकारी तिजोरीतून कार्यक्रमाची बिलं परस्पर अदा करण्यात आली आहेत. 'मी मुख्यमंत्री बोलतोय' हा कार्यक्रम 1 ऑक्टोबर 2017 रोजी शेवटचा प्रसारित झाला होता. आतापर्यंत प्रत्येक महिन्याला या कार्यक्रमाचे 19 लाख 70 हजाराचे बिल कंपनीला देण्यात आले आहे.


मात्र, 10 महिने या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नसताना आणि हा कार्यक्रम प्रसारित झाला नसताना बिलं कशी अदा करण्यात आली, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही माहिती समोर आली. काही न करता या कंपनीला 10 महिन्यात 2 कोटी 36 लाख रुपये देण्यात आले. या कार्यक्रमासाठी माहिती आणि जनसंपर्क विभागाची सर्व यंत्रणा वापरली जात होती. आपल्या मर्जीतील लोकांना फायदा व्हावा म्हणून हे केले गेले, असा आरोप काँग्रेसने केला आहे.